
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे भारतीय लोकांमध्ये स्थूलता (लठ्ठपणा) वाढत आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणा वाढीस लागलेला आहे. लठ्ठपणामुळे आज अनेकांना हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग, थायरॉईड, संधीवात यांसारख्या विविध दीर्घकालीन आजारांना सामोरे जावे लागत आहे. कारण, घरी बनविलेल्या पदार्थांपेक्षा बाजारतील हवाबंद डब्यांतील पदार्थ खाण्याकडे कल वाढत चालला आहे. खमंग आणि कुरकुरीत, जिभेला हवेहवेसे वाटणाऱ्या बटाटा चिप्स, कुरकुरे, वेफर्स यांसारखे अनेक पदार्थ देशी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून रोज हजारो टनांनी विकले जात आहेत. याशिवाय, गल्लोगल्ली सहज आणि स्वस्त दरांत उपलब्ध होणारे भेळपुरी, शेवपुरी, समोसे, वडा-पाव, मिसळ-पाव यांसारखे अनारोग्यकारक पदार्थ खाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळेच ४० वर्षापूर्वीच भारतात नगण्य असणाऱ्या मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, थायरॉईड, संधीवात यांसारख्या रोगाशी संबंधित असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाने तर भारताला पूर्णपणे विळखाच घातला आहे. भारतात २०१३ मध्ये मधुमेही रुग्णांची संख्या साडे सहा कोटी होती. २०३० पर्यंत म्हणजे आणखी १४ वर्षांनी भारतातील मधुमेहींची संख्या दहा कोटींच्या वर जाईल, असा वैद्यकीय तज्ञांचा अंदाज आहे.
मधुमेह हा अनुवांशिक विकार असल्याचा समज पूर्वी होता, पण हल्ली मात्र हा समज पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. आई-वडील किंवा आजोबा-आजींना, घराण्यातील कुणालाही मधुमेह नसला तरीही नव्या पिढीतील अगदी २०-२२ वर्षाच्या युवकांनाही मधुमेहाने ग्रासल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली, चंगळवाद, लठ्ठपणा, पाश्चात्य पदार्थ खायची चटक आणि वाढता मानसिक ताण-तणाव!
या सर्वांवर यशस्वीपणे मात करता यावी आणि सर्व उपयुक्त आणि खरी माहिती एकाच छत्राखाली उपलब्ध व्हावी यासाठीच ही वेबसाईट तयार केलेली आहे.