प्रकार 1 चा मधुमेह किंवा टाईप वन डायबिटीस म्हणजे काय?
हा लहान वयात अचानक होणारा असा मधुमेहाचा प्रकार आहे. स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही. इन्सुलिनच नसल्यामुळे पेशींना ग्लुकोज साखर मिळत नाही, त्यामुळे ती रक्तातच साठून राहते आणि वाढत जाते. रक्तातील ग्लुकोजचा शरीराला उपयोग करून घेण्यासाठी रुग्णांना नेहमी इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागते. मधुमेहाच्या या प्रकाराला मुलांचा मधुमेह असे म्हणतात. कारण हा लहान मुलांमध्ये किंवा १८ ते २० वर्षाच्या आतील कुमारांमध्ये आढळतो. साधारणपणे याचे प्रमाण दहा टक्के असते. स्वादुपिंडामधील बीटा पेशी नष्ट झाल्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन बंद होते, म्हणून रुग्णांना नेहमी इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागते. या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीरातील इम्यून सिस्टीम सदोष असते. जीवाणू आणि विषाणू यापासून शरीराला संरक्षण देणारी यंत्रणा शरीरातील स्वादुपिंडाच्या पेशींवरच हल्ला करून त्यांना नष्ट करते. त्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही.