
फास्ट फूड आणि स्लो फूड (Fast Food And Slow Food)
फास्ट फूड म्हणजे काय? असे अन्नपदार्थ जे लवकरात लवकर तयार करून लगेच खायला देता येते आणि खाणाऱ्या ग्राहकालाही ते पटकन किंवा उभ्या उभ्या देखील खाता येते. अगदी गाडी चालवताना, चालता-चालता, शाळेत मधल्या सुटीत पटकन खाता येतील असे पदार्थ म्हणजे फास्ट फूड.
फास्ट फूड म्हणजे फक्त पिझ्झा, बर्गर, कोकाकोला हे किंवा असे पाश्चात्य पदार्थ असा अनेकांचा गोड गैरसमज असतो. पण तज्ञांच्या मते खरी गोष्ट अशी आहे की आपण आवडीने खात असलेले अनेक पदार्थ फास्ट फूडच्या व्याख्येत बसतात

वडापाव हे फास्ट फूडचआहे
जिथे आरामात बसण्याची गरज भासत नाही, काटे चमचे प्लेट्स यांचीही फारशी गरज नसते, अशी व्यवस्था म्हणजे फास्ट फूड शॉप! आपल्याकडे गल्लोगल्ली आढळणाऱ्या वडापाव, पाणी-पुरी, भेळपुरी, चायनीज यांच्या टपऱ्या म्हणजेच फास्ट फूड शॉप्स!
फास्ट फूड हे वाईट का समजले जाते?
फास्ट फूड हे सहसा तळलेले किंवा गोड असते. आपल्याकडे जे पदार्थ टपरीत किंवा हातगाडीवर बनवले जातात ते त्याच तेलात वारंवार तळतात. असे वारंवार तळलेले पदार्थ आरोग्याला फारच हानिकारक असतात. कारण त्यात आरोग्याला घातक असे ट्रान्स-फॅट असतात. शिवाय हे पदार्थ अधिक काळ टिकविण्यासाठी त्यात मीठ किंवा साखर जास्त प्रमाणात घातली जाते. त्यात जीवनसत्वे खनिजे आणि इतर पोषक घटक फार कमी प्रमाणात असतात कारण फास्ट फूडमध्ये भाज्या किंवा फळे नसतात किवा असली तरी जास्त शिजवल्या किंवा तळल्यामुळे त्यातले पोषक अन्नघटक नष्ट झालेले असतात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे फास्ट फूडमध्ये आरोग्यास उपयुक्त असा चोथा आणि प्रथिने कमी आणि आरोग्यास हानिकारक असणाऱ्या ट्रान्स-फॅट आणि कॅलरीज मुबलक प्रमाणात असतात.चोथा आणि प्रथिने कमी असण्याचे कारण म्हणजे त्यामध्ये कडधान्ये अभावानेच असतात. फास्ट फूडमध्ये असलेल्या अतिरिक्त उष्मांकांमुळे (कॅलरीज मुळे) लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी यांसारख्या दुर्धर व्याधी जडतात. आपल्याला हे रोग व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? नाही ना? मग फास्ट फूड, जंक फूड टाळण्यास पर्याय नाही!

फास्ट-फूडची विविधतेतील एकताः नावे वेगवेगळी पण परिणाम एकच! लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी वगैरे….
फास्ट फूड आणि जंक फूड एकच की वेगवेगळे?
जंक फूड या शब्दाचा अर्थ “कचरा अन्नपदार्थ” असा होतो. जे शरीराला उपयुक्त नाही परंतु खावेसे (किंवा हवेहवेसे) वाटते आणि ज्यात पोषक द्रव्ये नसतात किंवा अल्प प्रमाणात असतात असे पदार्थ म्हणजे जंक फूड! प्रत्येक जंक फूड फास्ट फूड असते पण प्रत्येक फास्ट फूड हे जंक फूड असेलच असे नाही. उदा. चिक्की किंवा भाजके चणे हे फास्ट फूडच्या व्याख्येत येतात पण त्यांना जंक फूड म्हणता येणार नाही.
उलट हे दोन्ही पदार्थ विशेषतः लहान मुलांसाठी पोषक आहेत. जंक फूड आणि फास्ट फूड असा भेद करता येणे अवघड असले तरी कोणते पदार्थ टाळायचे हे लक्षात घेतल्यास आपले जगण्यासाठी खाणे सोपे होईल.
फास्ट फूड आणि जंक फूडची यादी:
खालील पदार्थ कटाक्षाने टाळावेत किंवा वर्षातून फक्त दोन ते चार वेळा खावेत:
- पिझ्झा, बर्गर, रोल वगैरे फास्ट फूडचे सर्व प्रकार
- वडे, समोसे, बाकरवडी, भजी, कांदा-भजी, इत्यादी तळलेले पदार्थ
- केक, पेस्ट्री, टोस्ट, बटर, खारी नानकटाई इत्यादी बेकरीचे पदार्थ
- सर्व प्रकारची बिस्किटे (अगदी मारी सुद्धा!)
- पेढे, बर्फी, जिलेबी, रसगुल्ले, गुलाबजामून, रसमलाई, लाडू इत्यादी मिठाया
- सर्व शीत पेये (कोकाकोला, पेप्सी इत्यादी)
- आईस्क्रीम, कुल्फी इत्यादी
स्लो फूडची यादी (हे पदार्थ शक्यतो घरीच बनवलेले असावेत):
खालील पदार्थ खावेत:
- इडली, उपमा, डोसा इत्यादी
- लापशी, खीर (साखर बेताची असावी),
- थालीपीठ, पराठा,
- भाजके चणे, शेंगदाणे (कच्चे असल्यास उत्तम), चिक्की
- ओल्या शेंगा (भुईमूग), हिरवा वाटाणा, मक्याचे कणीस
- काकडी, सफरचंद, केळी, कलिंगड इत्यादी
- नेहमीचे घरगुती जेवणाचे पदार्थ: चपाती, भाकरी, पिठले, डाळ, दही इत्यादी
- जास्त चोथायुक्त पदार्थ
- डाळी / कडधान्यं: छोले, वाटाणे, हरभरे, डाळ, उसळ इ.
- मोड आलेली कडधान्यं (मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.)
- हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, टोमॅटो, काकडी, कांदा, कोबी
- पपई, पेरू, बोरे, कलिंगड, नाशपाती, सफरचंद, डाळिंब यांसारखी फळे
- आख्खी कडधान्ये- उदा. मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.
- कुरमुरे, भाजलेले चणे, मक्याचे कणीस, ओला हिरवा मटार इ.
- गहू, बाजरी, ज्वारी यांच्या पिठांच्या पोळ्या/भाकऱ्या
- पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या मिश्रपिठांच्या भाकऱ्या
- पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या रव्याची खीर किंवा उपमा
- व्होल व्हीट ब्रेड पासून बनवलेले व्हेज सॅंडविच
भरपूर उपयोगी माहिती आहे.
Best information ever
Best information ever i have readed keep giving information to us