मुलांचा आहार (Food For Kids-Article in Marathi)

आहाराचे ज्ञान पुस्तकातच!

शाळकरी मुलांचं विज्ञानाचं पुस्तक कधीतरी उघडून पहा. आहार, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, आवश्यक स्निग्ध पदार्थ हे शरीराच्या वाढीसाठी, रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी किती आवश्यक असतात यांबद्दल सर्व माहिती या पुस्तकांमध्ये असते. मुलं ही सर्व माहिती वाचून पाठ करतात आणि परीक्षेत मार्कही मिळवतात. पण प्रत्यक्षात मात्र रोज वडा-पाव, समोसे, ब्रेड-जाम, पिझ्झा-बर्गर असले पदार्थ खातात.पुढे वाचा....

कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती यांसाठी घरी बनवलेल्या सकस, चौरस आणि संतुलित आहाराची गरज

या मुलांच्या आई-बाबांना यामुळे सतत काळजी लागून राहिलेली असते की मुलं जेवत नाहीत. जेवणाऐवजी चिप्स, बिस्किटं, फरसाण, केक यासारखं जंक फूड आणि फास्ट फूड त्यांना आवडतं. याशिवाय मोबाईल, टीवी आणि गेम खेळण्यात सतत लक्ष असल्याने पौष्टिक संतुलित आहार मुलं दुर्लक्ष करतात. मुलांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी आणि मुलांची रोगप्रतिकारक शक्ती टिकवणे आणि वाढवणे यासाठी तसेच अभ्यासात लक्ष लागून शाळेत परीक्षेच्या तयारीसाठी कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती यांची जोपासना आणि वाढ करण्यासाठी घरी बनवलेल्या सकस, चौरस आणि संतुलित आहाराची अत्यंत गरज असते. प्रथिने, आवश्यक स्निग्ध पदार्थ (essential fats), जीवनसत्वे (vitamins), लोह (iron), कॅल्शियम (calcium) आणि आयोडीन (iodine) यांसारखी खनिजे (minerals) या सर्व अन्नघटकांना या वयात फार महत्त्व असते.

why kids dont eat healthy marathi मुले का जेवत नाहीत

मुले का जेवत नाहीत?

मुलांमध्ये घरच्या जेवणाची आवड निर्माण कशी होईल?

हे असे का होते, मुलांना घरचे जेवण बेचव का लागते? ती पोळी भाजी, डाळ-भात खायचा कंटाळा का करतात? मुलांमध्ये घरच्या जेवणाची आवड निर्माण कशी होईल?
सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवे की मुले ऐकत नसतात. पालकांचे न ऐकणे हा त्यांचा उपजत गुण असतो. त्याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही. लहान मुलं ही बऱ्याच अंशी प्राण्याच्या पिलांसारखी असतात. ती ऐकत नाहीत पण अनुकरण मात्र करतात. आता सकस आहाराची सवय त्यांना लावायची असेल तर काय करायला हवे हे तुमच्या लक्षात आले असेलच! मुले अनुकरणप्रिय असल्यामुळे घरातली वडीलधारी माणसे, आई-बाबा जर घरचं सकस संतुलित आणि आरोग्यदायी अन्न खात असतील तर मुलंही तेच खातील!

मुलं अनुकरणप्रिय असल्याने सर्वांनी एकत्र बसूनच जेवण करावे

मुलं अनुकरणप्रिय असल्यानेच आई-बाबा आणि घरातले इतर सर्व यांनी शक्यतो मुलांसोबत एकत्र बसूनच जेवण करावे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या ‘आवडीचे’ वेगळे जेवण बनवू नये. सर्वजण खात असलेले अन्नच त्यांना द्यावे म्हणजे त्यांना तशी सवय लावावी. सकस आहार खाऊ घालण्यासाठी मुलांना ‘लाच’ देऊ नये. लाच दिल्याने किंवा आमिष दाखवल्याने मुलांना सकस आहार म्हणजे शिक्षा वाटेल आणि प्रत्येक वेळेला ‘लाच’ वाढत जाईल. म्हणून हे टाळावे. सुरुवातीला हे अवघड वाटेल, पण तो टप्पा पार केल्यानंतर एकदा मुलांना सकस आहाराची सवय झाली की मग काही त्रास होणार नाही आणि मुलं आनंदाने सकस जेवण जेवायला लागतील.

२ ते ५ वर्षे वयोगटाच्या मुलांना सकस जेवण देताना

२ ते ५ वर्षे वयोगटाच्या मुलांना सकस जेवण देताना वेगळी शक्कल लढवावी लागते. त्याला सकस काय आणि जंक काय याची अजिबात जाणीव नसते. जे जिभेला चांगले लागेल ते तो खातो. अशा मुलांना चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देऊन त्यांचा विश्वास संपादन करावा आणि त्यांना गोड गोड गोष्टींमध्ये गुंतवून सकस अन्न भरवावे.

५ ते १५ वर्षे वयोगटाच्या मुलांना सकस जेवण देताना

२ ते ५ वर्षे वयोगटाच्या मुलांना वरच्या परीच्छेदात दिल्याप्रमाणे शक्कल नाही वापरली तर त्याला जंक फूड खायची सवय लागेल आणि नंतर ती मुलं ५ ते १५ वयोगटात पोचल्यानंतर ती वाईट सवय घालवणे अशक्य होईल. ५ ते १५ वयोगटाच्या मुलांसाठी शिस्तीचा बडगा गरज लागली तर वापरावा. सुरुवातीला कठोर व्हावेच लागते, त्याचा फायदा आयुष्यभर होतो. चटक-मटक रोज देऊ नये. पण आठवडय़ातून एखादा दिवस ठरवून काही तरी ‘खास’ आवडीचा फराळ जरूर द्यावा पण रोज नाही.

मुलांना आहाराबाबत माहिती करून देणे. त्यांना रागवून काही उपयोग नसतो. त्याऐवजी त्या पदार्थाचे फायदे आणि जंक फूडचे तोटे त्यांना समजावले पाहिजेत.

भुकेच्या आधी काही देऊ नये. कडकडून भूक लागल्यावर सकस अन्न भरवणे सोपे असते.

मुलांना भूक लागण्याआधी शक्यतो काहीही देऊ नये. त्यांना कडकडून भूक लागल्यानंतरच सकस घरघुती जेवण द्यावे म्हणजे ती खळखळ न करता खातील. भूक अर्धवट लागलेली असल्यास मुलं नखरे करतात, सकस आहार न घेता चमचमीत जंक फूड मागतात. त्यामुळे मुलांना आपले पोट कधी भरले आणि काय खाल्ले याचे समाधान मिळत नाही. अशा मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढते आणि मग कमी वयात डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर अशा प्रकारच्या व्याधी जडू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *