मधुमेह म्हणजे काय? (What Is Diabetes?)

Diet for diabetes marathi

मधुमेह म्हणजे काय? (What Is Diabetes?)

आजकाल आपण आपल्या सभोवताली विविध आजारांनी ग्रासलेल्या व्यक्ती पहात आहोत. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, संधिवात इत्यादी विकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यातही मधुमेहाने आपल्या समाजाला चांगलेच व्यापून टाकले आहे. जगभरात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. जगात दर पाच सेकंदाला मधुमेहाचा एक नवीन रुग्ण सापडतो! भारतीय समाजातही एकविसाव्या शतकात वेगाने पसरलेला आजार म्हणजे “मधुमेह”! घरोघरी डायबेटिस आणि गल्लोगल्ली “डायबेटिस स्पेशालिस्ट” अशी परिस्थिती मध्यम आणि मोठ्या शहरांमध्ये निर्माण झालीय. खेड्यापाड्यांमध्येही ही परिस्थिती येऊ घातलीय.

मधुमेह हा सुरुवातीला लक्षात न येणारा आजार आहे. त्याची कोणतीही लक्षणे नसतात. मधुमेह झाला म्हणून घाबरुन न जाता त्याचा सामना केला पाहिजे. वैद्यकीय तज्ज्ञांकडून वेळच्या वेळी तपासण्या, जीवनशैलीमध्ये बदल त्याचबरोबर धावणे, चालणे, सायकलिंग यांसारखे व्यायाम नियमित करुन या मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. त्याबरोबरीनेच मधुमेहाविषयीचे गैरसमजही समाजात फोफावत आहेत. ऐकीव/इंटरनेटद्वारा शोधलेल्या माहितीची विश्‍वासार्हता तपासून न पाहताच त्याचे अंधानुकरण केल्याने गैरसमजांमध्ये भरच पडत आहे. हे गैरसमज वेळीच दूर केले पाहिजेत.

मधुमेहाविषयी सर्वसामान्यांना असलेली माहिती (किंवा अर्धवट माहिती!)

मधुमेह किंवा डायबेटिस या शब्दाचा उच्चार केला की सगळ्यांच्या जिभेवर येणारा पहिला शब्द म्हणजे शुगर किंवा साखऱ्या रोग! मधुमेहाचा आपण चहात वापरतो त्या साखरेशी अकारण संबंध जोडला गेला आहे. बऱ्याच लोकांना गोड पदार्थ खायला आवडतात. तसेच आपल्याकडे वाढदिवस, लग्न, प्रमोशन इत्यादींच्या सेलेब्रेशनला गोड खाण्याची प्रथा आहे. साखर घातलेला चहाही आपल्याला रोज लागतोच! त्यामुळे गोड खाण्यावर बंदी म्हणजे अन्याय असं अनेकांना वाटतं. डायबेटिस झाला की रक्तातील साखर वाढते , सारखी साखर तपासावी लागते आणि साखर खाणे बंद! झालंच तर भात बंद! आणखी काहीजणांसाठी बटाटे बंद! एवढी माहिती साधारण सर्वांना असते. मधुमेह झालाय हे कळल्यावर त्या व्यक्तीची परिस्थिती विचित्र झालेली असते! इतके दिवस इतराना असलेला आजार अचानक आपल्याकडे कसा काय मुक्कामाला आलाय अशी भावना होते. मग सांगोवांगी माहितीवर आधारित “उपचार” सुरू होतात! मेथी, कारले, दालचिनी, जांभूळ आणि त्याच्या बिया, कोरफड असे सर्व पदार्थ आजमावून बघितले जातात! हा उपचार सांगणारे छातीठोकपणे सांगत असतात, पण रक्तातली साखर काही दाद देत नाही! ती वाढलेलीच राहते किंवा किरकोळ प्रमाणात कमी होते. म्हणजे वर सांगितलेले तथाकथित “उपचार” सुरू करण्यापूर्वी साखर ३७५ असेल तर उपचारानंतर ती बिचारी ३६० वर येते! मग रुग्ण डॉक्टरकडे जातो आणि औषधोपचार सुरू होतात.

मधुमेह म्हणजे काय?

ग्लुकोज नावाची साखर आपल्या रक्तात असते. शरीरातल्या अवयवांना आणि पेशींना कार्य करण्यासाठी लागणारी ऊर्जा या ग्लुकोज नावाच्या साखरेपासून मिळते. आपण जेवणातून घेतलेल्या पिष्टमय पदार्थ आणि कर्बोदकांचे पचन होऊन त्यांचे ग्लुकोज साखरेत रुपांतर होते, आणि ही साखर नंतर रक्तप्रवाहात जाते. ही साखरेची पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक झाली की स्वादुपिंडाच्या बीटा पेशी कार्यरत होतात आणि योग्य प्रमाणात इन्सुलिन नामक संप्रेरकाची निर्मिती करतात. इन्सुलिन संप्रेरक ह्या वाढू पाहणाऱ्या रक्तशर्कारेला नियंत्रणात ठेवण्याचे महत्वाचे कार्य करते. इन्सुलिनमुळेच आपल्या रक्तातल्या साखरेचे स्थलांतर यकृत, स्नायू आणि चरबी साठवणाऱ्या पेशीमध्ये होत असते. त्यामुळे आपल्या रक्तातली साखर साधारण ८० ते १२५ या सुरक्षित पातळ्यांमध्ये राखली जाते. जेव्हा स्वादुपिंडातून इन्सुलिन तयार होण्याचे कार्य मंदावते, आणि/किंवा, इन्सुलिनचा रक्तशर्करेवरचा प्रभाव कमी होतो, तेव्हा आपल्या रक्तातली साखरेची पातळी सुरक्षित मर्यादेच्या बाहेर जाते. यालाच आपण मधुमेह म्हणतो.

मधुमेही व्यक्तीच्या रक्तात साखर, पण शरीरात मात्र तिची कमतरता!

मधुमेही व्यक्तीच्या रक्तात भरपूर साखर असते पण ती शरीराला (पेशींना) वापरता येत नाही. साखर रक्तात आहे पण शरीरात (पेशीत) नाही अशी एक विचित्र अवस्था मधुमेहात निर्माण होते. उदाहरणार्थ, तुम्ही बोटीने समुद्रमार्गे प्रवासाला निघाला आहात असे समजा. तुमच्याकडे एक बाष्पीभवन यंत्र असून, तुम्ही समुद्राचे खारे पाणी शुध्द करून प्यायला वापरता असे समजा. आता जर अचानक तुमचे बाष्पीभवन यंत्र निकामी झाले तर तुमची अवस्था काय होईल? पाण्याच्या महासागरात तुम्ही संचार करीत आहात, पण, ते पाणी पिऊ मात्र शकत नाही! मधुमेही व्यक्तीच्या शरीरात जणू काही साखर कारखानाच असतो, पण त्या साखरेचा शरीराला मात्र काहीच उपयोग करून घेता येत नाही! आणि त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे, ही रक्तातली वाढलेली साखर संपूर्ण शरीरात विध्वंसक धुमाकूळ घालत असते. आपले रक्त संपूर्ण शरीरभर फिरत असल्याने जवळजवळ प्रत्येक अवयवावर मधुमेहाचा दुष्परिणाम दिसून येतो.

मधुमेहापासून बचाव (prevention) कसा करता येईल?

आशियाई देशांमध्ये फारच कमी वयात मधुमेह होतो. फिनलंड व दक्षिण कोरिया या देशांनी मधुमेह आणि हृदयविकार या आजाराचे प्रमाण कमी करण्याची उत्तम कामगिरी बजावली आहे. नियमित व्यायामाला योग्य आहाराची जोड दिली तर हे शक्य आहे. त्याचबरोबर मन शांत ठेवणे व त्यासाठी मानसिक तणाव कमी करणे यासाठी योग किंवा ध्यानधारणाही आवश्यक आहे.

1 thought on “मधुमेह म्हणजे काय? (What Is Diabetes?)

  1. Diabetes says:

    धन्यवाद ह्या माहिती बद्दल !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *